त्या प्राथमिक शिक्षकांचे निलंबन करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-इसळक (ता. नगर) येथील जि.प. प्राथमिक शाळेवर नगर पंचायत समितीने पदस्थापना देऊन इतर ठिकाणी निलंबनाची कारवाई झालेल्या शिक्षक धोंडीबा जबाजी शेटे यांना नियुक्ती दिली आहे.  

मात्र सदर शिक्षक मनमानी पध्दतीने वागून, शालेय प्रशासनास त्रास देत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा आरोप करीत सदर शिक्षकास तात्काळ निलंबित करुन कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले आहे.

तर सदर शिक्षकाच्या चुकीच्या वागणुकीमुळे यापुर्वी देखील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सिताराम सकट, श्रीकांत शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम गिरगे, इसळकचे सरपंच बाबासाहेब गेरंगे आदी उपस्थित होते. धोंडीबा शेटे यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट येथे पुनर्स्थापित करण्यात आले होते.

परंतु बाबुर्डी घुमट येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी निलंबित शिक्षकास शाळेवर हजर करून घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसळक येथे ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकांना एक संधी म्हणून विरोध केला नाही. संबंधित शिक्षक काही दिवस हजर झाल्यानंतर व्यवस्थित आपले कर्तव्य बजावत होते. परंतु काही दिवसांनी त्यांनी चुकीच्या पध्दतीने वागण्यास सुरुवात केली.

शाळेवर वेळेवर न येणे, शनिवारच्या दिवशी शाळा सकाळी 7 ला असून देखील 10:30 ला येण्याचा प्रकार सुरु केला. सदर शिक्षकाची लेखी तक्रार मुख्याध्यापक यांच्याकडे केलेली आहे. संबंधित शिक्षक हे माहिती अधिकाराचा वापर करून विनाकारण प्रशासनाला व अधिकार्‍यांना त्रास देण्यात पटाईत आहे. शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जी कारवाई झालेली आहे ती माझ्यामुळे झालेली आहे व शिक्षण विभागात माहिती अधिकार अर्ज टाकून अधिकार्‍यांना घरी पाठविण्याच्या धमक्या सदर शिक्षक देत आहे. तर पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्याचे तो सांगत आहे.

शेटे हा शालेय व्यवस्थापन समितीला व ग्रामस्थांना एकप्रकारे धमक्या देत आहे. तसेच संबंधित शिक्षक हा स्वतःला अपंग म्हणून सांगत आहे. कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक गावागावांमध्ये ग्रामसुरक्षा समिती तसेच विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. विलगीकरण कक्षावर शेटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तरी हा शिक्षक गैरहजर होता. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते.

तसेच मुलांना मिळणारा शालेय पोषण आहार प्रत्येक मुलाच्या पालकांना शाळेत बोलून दिला जातो. या शिक्षकांने कोणत्याही विद्यार्थ्यास ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले नाही व वर्गातील कोणत्याही मुलांना पोषण आहार तसेच इयत्ता तीसरीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप केलेले नाही. शालेय विविध कामकाजासाठी नेहमीच गैरहजर राहून सदर शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करुन शासनाची फसवणुक करीत आहे.

हा शिक्षक मौजे तिखोल (ता. पारनेर) येथील रहिवासी असून, शाळेत शिकवणारे सर्व शिक्षक हे जवळच्या अंतरावर राहत आहे. परंतु शेटे हा 40 किलोमीटर दूर त्यांच्या मूळ गावी राहत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मनमानी पध्दतीने वागणार्‍या, शालेय प्रशासनास त्रास देत देणार्‍या व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्‍या वादग्रस्त शिक्षक धोंडीबा शेटे याला तात्काळ निलंबित करुन कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24