अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांच्या सोयीसाठी केडगाव, मोहिनीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नगरसेवक राहुल कांबळे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी राहुल अल्हाट, जॅकी काकडे, प्रविण पाचरणे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते. केडगाव परिसरातील मोहिनीनगर, दूधसागर, आदर्शनगर, ठुबे मळा, देवी मंदिर परिसर,
हनुमाननगर, इंदिरानगर, विद्यानगर आदी परिसरातील नागरिकांच्या लसीकरणाच्या दृष्टीने मोहिनीनगर येथील जिल्हा परिषद शाळा सोयीची ठरणार आहे.
या भागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना इतर लसीकरण केंद्रावर जावे लागत असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लांब जाण्यासाठी मोठी गैरसोय होत असून, इतर केंद्रावर असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव छपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
या भागातील नागरिकांची देखील सदरील शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी मोहिनीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.