अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : भिंगारमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : भिंगार मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. या मागणीचे निवेदन भिंगार शहर काँग्रेसच्यावतीने शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिले. याप्रसंगी बाळासाहेब भिंगारदिवे, संतोष धिवर, लखन छजलानी, संदिप गजभिव, प्रल्हाद भिंगारदिवे, अच्युत गाडे, राजू कडूस आदि उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, भिंगार शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम त्वरित सुरु करावे. कारण या रस्त्यावरील भिंगार नाला ते विजय लाईन चौकापर्यंत हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.

या रस्त्यावर कायम अपघात होऊन अनेकजण जखमी होत आहेत तर काही मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच भिंगार अर्बन बँक ते महात्मा फुले पतसंस्था रस्त्यावर खूप वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक झाल्यावर रुग्णवाहिका जाण्यासही अडचणी निर्माण होतात.

सदर रस्ता रुंदीकरण झाल्यास भिंगार शहरातील नागरिकांचा प्रश्न सुटू शकेल. या महामार्गाची प्रशासनाकडून तात्पुरती डागडूजी केली जात आहे. सध्या पावसामुळे परत हा रस्ता उखडतो व नागरिकांना पुन्हा त्रासास सामोरे जावे लागते.

तसेच या रस्त्यावरच भिंगार कॅन्टोमेंट, भिंगार हायस्कूल, रयत शिक्षण संस्थेची शाळा, प्रियदर्शनी स्कूल असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी आपण यात स्वतः लक्ष घालून या महामार्गाचे काम तातडीने सुरु करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office