Ahmednagar News : सोमठाणे नलवडे येथील प्राथमिक शाळेच्या आवारात दारूविक्री केली जाते. काही राजकारणी लोक त्यांना पाठबळ देत आहेत. लहान मुलांच्या मनावर याचा वाईट परिणाम होत असून,
अवैध व्यवसाय बंद करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शाळा व्यवनस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल आप्पासाहेब नलवडे यांनी दिला आहे.
सोमठाणे नलवडे गावात वेशीजवळच मंदिर व प्राथमिक शाळा आहे. शाळेजवळच काही लोक दारुविक्री करीत आहेत. अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, राजकीय पाठबळ असल्याने पोलिसही कारवाई करीत नाहीत.
शाळा व्यवस्थापन समितीने अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव घेतला व त्याची प्रत पोलिस ठाण्यात दिलेली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नलवडे यांनी पोलिस निरीक्षकांना भेट घेवुन अवैध दारूविक्री व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे. कारवाई झाली नाही तर उपोषण करण्याचा इशारा नलवडे यांनी दिला आहे.
अवैध व्यवसाय करणारे लोक गुंडशाही करीत आहेत. एका गरिब व्यक्तीला व त्याच्या आईला मारहाण करण्याची घटना शुक्रवारी घडली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस व अवैध व्यवसाय करणारे यांचे साटेलोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.