११ मार्च २०२५ पाथर्डी : बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेचा पाथर्डी येथील साडू प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रविवारी रात्री (दि. ९) गुन्हा दाखल झाला आहे.
जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात आजिनाथ सावळेराम खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चव्हाण याच्यासह एकूण आठ आरोपीं विरोधात खंडणी मागणे, धमकी देणे असा गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात खेडकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेवगाव रोड लगत मी व माझे मित्र विष्णू बाबासाहेब ढाकणे यांनी मिळून एक जमीन विकत घेतली आहे. ज्याच्या कडून ही जमीन घेतली त्याच्या कडून खरेदी केलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी खुणा करत असताना तेथे प्रशांत चव्हाण उर्फ गब्या याच्या सह नऊ जण व काही अनोळखी इसम आले.
यावेळी प्रशांत उर्फ गब्या म्हणाला की, सतीश उर्फ खोक्या भोसले हा माझा साडू असून तुम्ही या जमिनीत यायचे नाही व आला तर किंमत मोजावी लागेल, असे म्हणत शिवीगाळ केली.याच वेळी सुनीता भोसले म्हणाली, तुम्ही या जमिनीत आलात तर आम्ही बलात्काराचा तुमच्यावर व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, असा दम दिला.
यानंतर ९ जानेवारी रोजी रोजी मी व ढाकणे पेट्रोल पंपावर उभे असताना तेथे चव्हाण हा काही जणांना घेऊन आला व त्याने तुम्हाला तुमच्या जमिनीत यायचे असेल तर आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर तुम्हाला मी जमिनीत येऊ देणार नाही असा दम दिला. त्या नंतर असाच प्रकार १३ फेब्रुवारी रोजी घडला. यानंतर माझे मित्र अर्जुन धायतडक यांनी प्रशांत चव्हाण याला फोन करून माझ्या मित्राने घेतलेल्या जमिनीला विरोध करू नका असे समजावून सांगितले.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
अजिनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या चव्हाण, शिल्पा प्रशांत चव्हाण, सुनीता संजय भोसले, इंदूबाई आबाशा चव्हाण, शिल्पा अमोल काळे, संतोष अब्बास चव्हाण, काजल भाऊराव काळे, अनिता निस्तान काळे (सर्व रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.चव्हाण याने पुन्हा एकदा एक कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.