अहमदनगर बातम्या

सिव्हिलच्या डॉक्टर,परिचारिकांना आग प्रतिबंधक उपायोजनांचे प्रात्यक्षिक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाने डॉक्टर, परिचारिका, साफई कामगार आणि आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर आग प्रतिबंधक उपायोजनांचे प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी हे प्रात्यक्षिक दाखविले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील जुने परिचारिका प्रशिक्षण आणि वसतिगृहात हे शनिवारी सकाळी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जमदाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली बांगर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, प्रशिक्षणार्थी परिचारिका, सफाई कामगार,आस्थापना विभागातील कर्मचारी उपस्थित होते. मिसाळ यांनी आगीचे वेगवेगळे प्रकार आणि ते विझविण्याच्या शास्त्रीय पद्धती सांगितल्या.

कार्बन डायऑक्साईड सिलेंडर हे सर्व प्रकारची आग विझविण्यासाठी वापरतात. कोरडी रासायनिक पावडर ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आग विझविण्यासाठी वापरावी. वाळू ही इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅसची आग विझविण्यासाठी उपयुक्त ठरते. हायड्रो सिस्टिम ही इमारतीच्या चारही बाजुंनी पाईपद्वारे प्रत्येक मजल्यावर पाण्याचा पाईप काढला जातो.

आग कोणत्या प्रकारची आहे, यावरून ही आग विझविण्यासाठी योग्य त्या साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगी विझविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

दुर्घटनेतील व्यक्तींना प्राथमिक उपचार कोणते करावेत, त्यांना बाहेर कोणत्या पद्धतीने काढावे, याचे ही प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशामक दलाचे बाळासाहेब घाटविसावे, भरत पडगे, बाळासाहेब वाघ, नानासाहेब सोलट, शाकीर रंगारी, मच्छद्रिं धोत्रे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office