सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर कामगारांची निदर्शने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार 8 ते 12 हजार रुपया पर्यंत वेतनवाढ मिळण्याच्या मागणीसाठी

लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, उपाध्यक्ष संजय कांबळे,

विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, बबन भिंगारदिवे आदिंसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ट्रस्ट व युनियनचा वेतनवाढीचा करार 2017 रोजी झाला होता.

त्याची मुदत मार्च 2020 मध्ये संपली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असून, वेतनाच्या फक्त 7 टक्के वेतनवाढ करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सदर प्रकरणी महागाई निर्देशांकनुसार 8 ते 12 हजार रुपया पर्यंत वेतनवाढ युनियनने सहा कामगार आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तीन तारखा होऊन देखील ट्रस्टचे विश्‍वस्त उपस्थित राहिलेले नाही. हा प्रश्‍न त्वरीत सोडविण्यासाठी कामगारांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.

गुरुवार (दि.17 डिसेंबर) ची तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याने देखील कामगारांनी संताप व्यक्त करुन गुरुवारीच ट्रस्टच्या विश्‍वस्तांना बोलवून चर्चा घडवून आनण्याचे स्पष्ट केले.

युनियनच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्याशी कामगारांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा केली.

सहाय्यक कामगार आयुक्त राऊत यांनी सकारात्मक दृष्टीने चर्चा करुन कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्‍वासन देत ट्रस्टच्या विश्‍वस्तांशी संपर्क साधून त्यांना तारखेला बोलवले, तरी देखील विश्‍वस्त उपस्थित राहिले नाही. ही बैठक शुक्रवारी पुन्हा बोलवण्यात आली आहे.

अ‍ॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात कामगारांनी ट्रस्टच्या विश्‍वस्तांना समजून घेतले. महागाईच्या काळात जगण्यासाठी कामगारांना पुरेश्या प्रमाणात वेतन मिळणे आवश्यक आहे. मात्र पगार वाढ न करणे व आडमुठीपणाचे ट्रस्टचे धोरण कामगारांना मान्य नाही.

कोरोना काळात ट्रस्ट खरेदी व्यवहार करतात, मात्र कर्मचारी वर्गासाठी पगार वाढ न देणे हे अन्यायकारक आहे.

ट्रस्टने इतर खर्च कमी केल्यास कामगारांना पगारवाढ देणे सहज शक्य होणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. अ‍ॅड. कॉ.सुभाष लांडे यांनी कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विश्‍वस्तांनी चर्चेला आले पाहिजे.

किमान वेतन, सेवा शाश्‍वती, सेवा पुस्तक आदि विविध हक्काच्या मागण्यांसाठी कामगारांचा हा संघर्ष असून, वेळ पडली तर कामगार न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे सांगितले.

युनियनचे अध्यक्ष सतीश पवार म्हणाले की, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट बाबांचे नांव घेऊन कामगारांवर अन्याय करीत आहे. न्याय हक्काच्या मागण्यांसाठी ट्रस्टचे कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आनली आहे.

कामगारांना किमान जगता यावे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येण्यासाठी वेतन पुरेश्याप्रमाणात देण्याची कामगारांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24