Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संगमनेर बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या साखळी उपोषणास भेट देण्यासाठी आलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काल रविवारी उपोषणकर्त्यां सकल मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने संगमनेरात साखळी उपोषण करण्यात येत आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रविवारी दुपारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मंत्री विखे पाटील आंदोलनस्थळी येताच उपस्थित काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
यावेळी विखे समर्थक अमोल खताळ यांची उपस्थित कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
याप्रसंगी पंकज पडवळ म्हणाले की, पालकमंत्र्यांनी उपोषणास पाठिंबा देण्यापेक्षा मुंबई येथे जाऊन मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करावा. दत्ता ढगे म्हणाले, सत्ताधारी व त्यांचे समर्थक मराठा समाजाला फसू पाहत आहेत. मात्र आता जनता शांत बसणार नाही..
घोषणाबाजीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवले
महसूल मंत्री विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी सुमारे अर्धा तास थांबून कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपला व भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. दरम्यान, आपल्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवण्यात आले होते, असे ते म्हणाले.