Ahmednagar News : शेवगाव तालुक्यात २०२३/२४ या वर्षात अत्यंत अल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतमालाचे संपूर्ण नुकसान झाल्याने शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत.
शेवगाव तालुक्यातील ११३ गावांपैकी खरिपाच्या ३४ गावांमध्ये या आधीच ५० टक्क्यांच्या आत आणेवारी जाहीर झालेली असताना अद्याप अनुदान वाटपाचा जीआर आलेला नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही.
शासनाने तातडीने दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अशी मगाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान न मिळाल्याने शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत.
त्यामुळे कृषीच्या वीजबिलाची वसुली थांबवून बिलात ३३ टक्के सूट द्यावी, रोजगार हमीची कामे चालू करावीत, जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करावी, कर्जवसुली थांबवावी, कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, तालुक्यातील चापडगाव, ढोरजळगाव, बोधेगाव, भातकुडगाव, एरंडगाव ही महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य म्हणून अगोदरच जाहीर केलेली आहेत.
याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा करावे व राहिलेल्या रब्बीच्या ७९ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत करावी अन्यथा दि. २० मार्चपासून गावोगावी साखळी उपोषण करण्यात येईल.