अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- श्रीगोंदे कृषी उत्पन बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे (३५) यांनी नैराश्यातून स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (२ जानेवारी) पहाटे दौंड येथील राहत्या घरी घडली.
श्रीगोंदे तालुक्यातील राजकारणातील प्रतिष्ठित व श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे ३५ वर्षीय चिरंजीव दादासाहेब नलगे यांनी शनिवारी त्यांच्या दौंड येथील राहत्या घरी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली.
नलगे यांना दादासाहेब व सुधीर ही दोन मुले आहेत. त्यापैकी दादासाहेब हे दौंड येथील हॉटेलचा व्यवसाय पहात होते. त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दादासाहेब हे काही दिवसांपासून तणावाखाली होते.
त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. घटनेची माहिती दौंड पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.