अहमदनगर बातम्या

श्रीरामपूर बाजार समितीच्या सभेत उपसभापतींचा ठिय्या

Published by
Ahmednagarlive24 Office

सभापती व प्रभारी सचिवांनी बेलापूर ग्रामपंचायतीची कराची रक्कम दिवाळीपूर्वी अदा न केल्याने उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी येथील बाजार समितीच्या मासिक सभेत ठिय्या मांडला.

यावेळी समितीच्या आवारात माजी सचिव किशोर काळे यांना झालेल्या मारहाणीवरून माजी सभापती व ज्येष्ठ संचालक सचिन गुजर यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. त्यामुळे सभापती सुधीर नवलेंसह सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली.

बाजार समितीमध्ये सभापती, उपसभापती व प्रभारी सचिव हे तिघेही बेलापूर गावचे प्रतिनिधी आहेत. उपसभापती खंडागळे हे गावचे उपसरपंच असून, सभापती सुधीर नवले हे त्यांचे पारंपरिक विरोधक आहेत. प्रभारी सचिव साहेबराव वाबळे हे पूर्वी खंडागळे यांचे गावच्या राजकारणात सहकारी होते. मात्र, आता त्यांचे बिनसले आहे.

नुकत्याच झालेल्या समितीच्या मासिक बैठकीत उपसभापती खंडागळे यांची सभापती नवले व सचिव वाबळे यांच्याशी खटके उडाले. समितीच्या वतीने संस्थेच्या बेलापूर उपबाजाराच्या कराची रक्कम दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी ग्रामपंचायतीला अदा करण्यात येते.

रक्कम अदा करण्यास समितीच्या ऑक्टोबर महिन्याच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. ग्रामपंचायतीला या कराच्या पैशातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी पगार व बोनस करण्यास मदत होणार होती. त्यामुळे उपसभापती खंडागळे हे या पैशांसाठी आग्रही होते.

तसे पत्र त्यांनी समितीच्या सभापती व सचिवांना दिलेले होते. मात्र, संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळूनदेखील रक्कम ग्रामपंचायतीस अदा करण्यात आली नाही. याचा निषेध म्हणून खंडागळे यांनी समितीच्या संचालक मंडळ बैठकीत ठिय्या दिला.

अपप्रवृत्तींना खतपाणी नको यावेळी माजी सभापती सचिन गुजर यांनी किशोर काळेंना समितीच्या आवारात झालेल्या मारहाणीच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अपप्रवृत्तींना खतपाणी घातले गेले, तर काळे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार संचालकांसोबतही होऊ शकतो.

नेत्यांनी यात लक्ष घालून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. श्रीरामपूरच्या सुसंस्कृत राजकारणात घातक पायंडा पाडू नये. आपसात कितीही टोकाचे वाद असले, तरी ते उचित व्यासपीठावर सोडावावेत, असे गुजर यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office