अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरुन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करणार्या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई न करता तक्रारदारांनाच धमकाविणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा.
पो.नि. मोहन बोरसे यांच्या कामकाजाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात आले होते.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.29 जानेवारी) पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे व विशाल ढुमे यांनी भूजल सर्वेक्षण कार्यालय येथे चालू असलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करणार्या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, जिल्हा संघटक साईनाथ बोराटे, दिपक चांदणे, शाहीर कान्हू सुंबे, हरीभाऊ हारेर, सचिन चेमटे, संतोष निकम, मच्छिंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
तरी देखील अद्यापि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. टाळेबंदी काळात खाजगी फायनान्स कंपन्यांनी गुंडांना हाताशी धरुन पठाणी पध्दतीने अवाजवी हप्ता वसुली केली. सदर प्रकरणी फायनान्स कंपन्यांवर कारवाई होण्यासाठी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते.
तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील यासंबंधी निवेदन देण्यात आले. राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून योग्य तपास करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहा. पो.नि. मोहन बोरसे यांना योग्य चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले
होते. तक्रारदार चांदणे यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेले असता सहा. पो.नि. बोरसे यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरुन धमकाविल्याने संघटनेने प्रजासत्ताक दिनी खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करणार्या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई न करता तक्रारदारांनाच धमकाविणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा.
पो.नि. मोहन बोरसे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीसाठी उपोषण सुरु केले होते. उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने पुन्हा राज्यमंत्री तनपुरे यांच्याशी कार्यकर्त्यांनी संपर्क साधला.
त्यानंतर शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकारांनी उपोषणकर्त्यांची तातडीने भेट घेऊन त्यांची समजूत काढत खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.