भीषण पाणीटंचाई, तरी प्रवरा नदीत पाणी सोडण्यास विरोध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सध्या पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना बसत आहेत. अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवरा नदीपात्रातील बंधारे भंडारदरा धरणातील पाण्याने भरुन द्यावेत,

अशी मागणी होत आहे, परंतु तालुक्यातील कान्हेगाव येथे प्रवरा नदीपात्रात दोन तालुक्यांना अत्यंत जवळून जोडणाऱ्या पुलाचे काम सध्या सुरू आहे.

पुलाच्या पायाचे खोदाईचे काम प्रगतीपथावर आहे. अशात नदीला पाणी सोडले, तर पुलाचे काम बंद पडेल, बंधारा भरल्यानंतर दोन वर्षे तरी काम पूर्ण होण्याची शक्यता नाही.

त्यामुळे कान्हेगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी नदीत पाणी सोडण्यास विरोध दर्शवला आहे. कान्हेगाव येथे प्रक्रा नदीवरील होऊ घातलेला पूल हा राहुरी व श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

या पुलाची निर्मिती करण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. मात्र, तरीही या कामासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागली. दोन तालुक्यांना अत्यंत जवळून जोडण्याच्या उदात्त हेतूने या पुलाची निर्मिती होत आहे.

पुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. काही महिन्यांतच पुलाचे काम पूर्ण होईल. सध्या भीषण पाणीटंचाई आहे. नदीपात्रात पाणी सोडणेही गरजेचे आहे, परंतु त्यामुळे युध्द पातळीवर सुरू असलेल्या पुलाचे काम बंद पडणार आहे.

त्यामुळे पढेगाव व त्यावरचे बंधारे भरावेत, परंतु खाली पाणी सोडू नये, अशी मागणी पढेगाव, टाकळीमियों, त्रिवंकपूर, लाख, जातप, दरडगाव आदी गावांतील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या रात्र न् दिवस काम सुरू असून लवकरात लवकर खड्ढे भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे पत्रही पाटबंधारे विभागाला दिल्याची माहिती समजली.

लाखो रुपये पाण्यात जातील

मंजूर झालेल्या पुलाचे काम एका वर्षात पूर्ण करण्याची ठेकेदाराला मुदत आहे. पायाभरणीसाठी लाखो रुपये खर्च करून नदीपात्रात खड्डे खोदले आहेत. त्याचे पुढील काम करायला स्टील डिझाईन उशिरा प्राप्त झाल्याने ते भरता आले नाही.

आता डिझाईन आले, मात्रपाणी येण्याच्या आत ते भरतील किंवा नाही याबाबत शंका आहे. कारण त्याला किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

लाख दगडी बंधाऱ्यामुळे पाणीही सोडता येणार नाही

प्रस्तावित पुलाच्या पुढे ब्रिटीशकालिन लाख दगडी बंधारा आहे. त्याला पाणी सोडण्याची सोय नाही. तो एवढा पक्का आहे की सुरुंग लावूनही फुटणार नाही. त्यामुळे पाणी आले, तर ते साठून राहील. त्यामुळे अनेक महिने काम बंद राहील.

शिवाय खोदलेले खड्ढे पुनः वाळूने बुजतील. ते पुन्हा खोदावे लागतील. पुढे परत पावसाळा आहे. आता जर हे काम लांबले, तर त्याचा खर्चही वाढणार आहे. सध्याचे टेंडर सुमारे नऊ कोटी रुपयांचे आहे.