अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-सभापती पोर्णिमा जगधने यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (२२) रोजी पार पडलेल्या पंचायत समितीच्या सर्व साधारण सभेसाठी काही विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास
येताच उपसभापती अर्जुन काळे यांनी कडक भूमिका घेत मासिक सभेला विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांनी गैरहजर राहून केलेली मुजोरी खपवून घेतली जाणर नाही,अशी तंबी दिली.
गैरहजर विभाग प्रमुखांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्यामार्फत पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीजमंडळ, एस.टी.महामंडळ, लागवड अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, तालुका लघूचिकित्सालय, कृषीविभाग, महाराष्ट्र जीवनप्राधिकरण, कुक्कुट प्रकल्प, ड्रेनेज विभाग,
ग्रामीण रुग्णालय आदी शासकीय यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या सर्वसाधारण सभेला तहसील, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, ड्रेनेज आदी विभागाचे जबाबदार विभाग प्रमुख व संबंधित अधिकरी गैरहजर होते.
तालुक्याच्या विविध शासकीय यंत्रणांना प्रशासकीय कामात येत असलेल्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी व भविष्यातील करावयाच्या उपाय योजना याबाबत विचारविनिमय करण्यासाठी प्राधान्याने मासिक सभेचे आयोजन केले जाते.
या सभेला सर्व शासकीय यंत्रणांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असले तरी काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून या सभेकडे पाठ फिरवली होती .