मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणसंदर्भात समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरु आहेत. आता या धनगर आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणसंदर्भात मागणी केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, धनगर समाजाला आरक्षण द्या पण ते स्वतंत्र आरक्षण द्या.
संविधानात अनुसूचित जाती, जमातीसाठी दिलेले आरक्षण हे संवैधानिक असल्याने ते इतर बाकीच्या कोणाला देणे शक्य नाही. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती. अकोल्यात शासकीय विश्रामगृहावर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत देखील भाष्य
मराठा आरक्षणाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यांवर सरकारकडून सकारात्मक मार्ग काढून ते मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठ्यांना देण्यात येणारे आरक्षण हे हक्काचे व न्यायालयात टिकणारे मिळाले पाहिजे, यासाठी सरकारबरोबर मीही आग्रही असल्याचे लहामटे यावेळी म्हणाले.
उपजिल्हा रुग्णालयाला ३७ कोटींची प्रशासकीय मान्यता
पत्रकार परिषदेत त्यानी उपजिल्हा रुग्णालयाला ३७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमधे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोवत गेल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले. उपजिल्हा रुग्णालय हे महाविकास आघाडीकडून मंजूर करण्यात आले असून अजित पवार यांनी खास बाब म्हणून मंजूर केले असेही ते म्हणाले.
मागील अधिवेशनात मी अकोले मतदारसंघात ३०० कोटींहून अधिकचा निधी आणला. आता नागपूरला २० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अकोल्यातील विकास कामांवर २५० ते ३०० कोटींचा निधी मिळेल. विकासाकामांसाठी व त्या निधीसाठी मी अजित पवार यांच्यासोबत गेलो असे ते म्हणाले.
शिर्डी पाठोपाठ अकोल्यातही एमआयडीसी होणार?
अकोले मतदार संघात एमआयडीसी करण्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. ते म्हणाले की, अकोले एमआयडीसीसाठी तालुक्यात योग्य जागा उपलब्ध होत नसल्याने मुळा खोऱ्यातूनच साधारण ३०० एकर जागेवर छोटी एमआयडीसी निर्माण करण्याचे माझे प्रयत्न आहेत. जर उद्योजकांकडून प्रतिसाद व जागा उपलब्ध जर झाली तर अकोल्यात एमआयडीसी निर्माण करू असे ते म्हणाले. म्हणजेच आता शिर्डी पाठोपाठ अकोल्यातही एमआयडीसी होणार का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.