अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : धरणात आठ टक्के पाणीसाठा ! दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पारनेर तालुक्याला वरदान ठरलेल्या मांडओहोळ धरणात पाऊस नसल्याने अवघा आठ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होण्याची शक्यता आहे.

पारनेर तालुक्यातील काताळ वेढे, पळसपूर, काळेवाडी, नांदूर पठार, पिंपळगाव रोठा, सावरगाव, या गावांच्या पावसावर अवलंबून असलेले व तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहोळ चे धरणात अवघा आठ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून नजिकच्या काळात पाऊस न झाल्यास परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर असून, तालुक्यातील ७३ गावांचा म्हणजे जवळ जवळ अर्धा तालुकाच तहानलेला राहितो की काय ? अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पठारावरील कान्हूर पठार कातळवेढे, कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर आणि १६ गावांना पाणीपुरवठा होत असलेली नळ पाणीपुरवठा योजनाही मांड ओहोळ धरणावर अवलंबून आहे.

मांडओहोळ धरणाची पाणीसाठा ३९९ दशलक्ष घनफूट तर प्रत्यक्षात उपयुक्त पाणी साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. पळशी, वासुंदे व खडकवाडी, या तीन गावांतील २ हजार २०० हेक्टर जमीन या धरणावर अवलंबून आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यातील जून, जुलै व ऑगस्ट, या तीन महिन्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरण पूर्णपणे भरून ओसांडून वाहू लागले. यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. आज अखेर मांड ओहोळ धरणात अवघा ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मांडओहोळ धरणाच्या कामाला प्रत्यक्षात १९७२ ला सुरुवात होऊन ११ वर्षांत पूर्ण होवून १९८३ साल उजडले. धरणाची उंची २७. ०७ मीटर, लांबी ७३९ मीटर असून, धरणासाठी ३ कोटी ६२ लाख रुपये खर्च झाला आहे. या धरण परिसरात लाखो पर्यटकांना आकर्षित करणारा रुई चोंडी धबधबाही पाऊस नसल्याने पर्यटकांविना निमणुष्य आहे.

पारनेर तालुक्यात आठ धरणे असून, त्यातील फक्त काळू प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तिखोल शुन्य टक्के, मांडवे शुन्य टक्के हे तर पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत. ढोकी एक २ टक्के ढोकी ४ टक्के, भाळवणी ४ टक्के, पळशी फक्त १ टक्के म्हणजे अक्षरशः शेवटच्या घटका मोजतायेत.

Ahmednagarlive24 Office