अहमदनगर बातम्या

धूमस्टाईल चोरीचे सत्र पुन्हा सुरु ; दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडले: १ लाखाचा ऐवज लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या नगर शहरासह ग्रामीण भागात देखील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रोज जिल्ह्यात चोरीच्या घटना घडत आहेत . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या भुरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. काही दिवस शांत झालेले धूमस्टाईल चोरीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्यानेशहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वेगवेगळ्या घटनात १ लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत सावेडी परिसरातील नातीसाठी चॉकलेट आणण्यासाठी मैत्रिणी सोबत पायी चाललेल्या ४५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमंतीचे मिनी गंठण मोटरसायकलवरील एक अज्ञात इसमाने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाईप लाईन रस्त्यावर घडली.

याबाबत सुजाता अष्टेकर (रा. श्रमिक नगर पाईपलाईन रोड) असे गंठण चोरी गेलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अष्टेकर या नात हिंदवी हिच्यासाठी दुकानातून चॉकलेट आणण्यासाठी मैत्रीण सारिका जामगावकर यांच्यासोबत कॉलनीकरून पाईपलाईन रोडकडे जात असताना समोरून लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर दोन अनोळखी आले. इसमाने अष्टेकर यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले.

मागील काही दिवसांपासून गप्प पडलेले हे भामटे आता परत सक्रिय झाले आहेत. धूमस्टाईल चोरट्यांमुळे संगमनेर शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि. २७ जुलै) दुपारी एक वाजेच्या सुमारास अकोले बाह्यवळण रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईलने ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे.

कमल राधाकिसन दिघे (रा.जनतानगर, संगमनेर) या अकोले बाह्यवळण रस्त्यावरुन पायी जात होत्या. दरम्यान, गांधी मोटर्सजवळ आल्या असता दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे गंठण ओरबाडून पोबारा केला.

याप्रकरणी कमल दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, गेले काही दिवस शांत झालेले गंठण चोरीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर पोलिसांसाठी डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांना यावर नियंत्रण मिळवता न आल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office