अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा,नगर आणि कोपरगावसाठी महाविकास आघाडीत होणार धुमशान? काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने घेतली शरद पवारांची भेट

Published by
Ajay Patil

Ahmednagar News: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडींना वेग आला असून अगदी कार्यकर्त्यांपासून तर नेतेमंडळी या सगळ्यांमध्ये या निवडणुकीचा उत्साह दिसून येत आहे. त्यासोबतच राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत अद्यापही काही जागांसाठी तिढा कायम असून येणाऱ्या दिवसात जागा वाटपा संदर्भातील तिढा संपेल असे देखील बोलले जात आहे

त्यातल्या त्यात अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नगर व कोपरगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच दिसून येत आहे व या पार्श्वभूमीवरच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एकत्रितपणे शरद पवार यांची संयुक्त भेट घेतली.

या भेटीदरम्यान काँग्रेसच्या माध्यमातून नगर आणि श्रीगोंदा मतदार संघाची मागणी करण्यात आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नगर साठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

 काँग्रेसचा श्रीगोंदा आणि नगर वर दावा तर ठाकरे गटाला हवे नगर

काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एकत्रितपणे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी कॉग्रेसने नगरसह श्रीगोंदा मतदारसंघ मागितला आहे, तर शिवसेना नगरसाठी आग्रही असल्याचे समजते.कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, श्रीगोंदा तालुकाप्रमुख प्रशांत दरेकर, घनश्याम शेलार, हेमंत ओगले, तसेच शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी ही भेट घेतली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने श्रीगोंदा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र, हा मतदारसंघ कॉग्रेसला सोडावा, अशी मागणी कॉग्रेसच्या नेत्यांनी पवारांना केली आहे. नगरवरही कॉग्रेसचा दावा आहे. शरद पवार गटही नगर शहर मतदारसंघावर दावा करत आह.

या पार्श्वभूमीवर शशिकांत गाडे यांनी नगर शहर मतदारसंघ कॉग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेसाठी सोडावा अशी मागणी पवारांकडे केल्याचे समजते.कॉग्रेसने उत्तर नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर हे पाच मतदारसंघ मागितले.

ठाकरे गट दोन जागा लढणार, कोपरगाववरही नजर

उद्धव ठाकरे गटाकडे सध्या शंकरराव गडाख यांच्या रूपाने नेवासा मतदारसंघात आमदार आहेत. गडाख यांनी यावेळी थेट मशाल चिन्ह घेऊन लढावे असा पक्षाचा आग्रह असल्याचे समजते.

त्यासह नगर शहर मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे.कोपरगावमध्ये समीकरणे कशी साकारतात याकडे ठाकरे गट लक्ष ठेऊन आहे.तेथे महायुतीत मतदारसंघ अजित पवार गटाला गेल्यास कोल्हे परिवार ठाकरे गटाला जवळ करणार की शरद पवार यांना याची उत्सुकता आहे.

 

 

 

Ajay Patil