अहिल्यानगर : ‘श्रध्दा अन सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत अनेकदा भाविकांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता ‘साईबाबा संस्थानचे सभासदत्व देतो,’ असे सांगून राजस्थान सरकारमधील माजी मंत्र्यालाच गंडवल्याचा प्रकार उघड झाला आहे जोगिंदरसिंग गिरवरसिंग अवाना (वय ५४, सध्या रा. नोएडा, जिल्हा गौतमबुद्ध नगर, दिल्ली) असे या माजी मंत्र्याचे नाव आहे .
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अमोल गुजराथी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की जोगिंदरसिंग अवाना हे साईभक्त असल्याने नेहमी शिर्डी येथे दर्शनासाठी येत असत. त्यांची सिन्नर येथील एका व्यक्तीच्या माध्यमातून शिर्डी येथील अमोल गुजराथी या व्यक्तीसोबत ओळख झाली.

त्यानंतर गुजराथीने साईबाबा संस्थानच्या नावाने बनावट संदेश पाठवला. ”प्रत्येक राज्यातून एक सभासद निवडला जात असून, सभासदत्वासाठी शुल्क ३ हजार रुपये आहे,” असा संदेश पाठवून त्याने इंग्रजी फॉर्मही पाठवला. या माहितीवर विश्वास ठेवून साईबाबांवरील श्रद्धेपोटी जोगिदरसिंग अवाना आणि त्यांचा मुलगा हिमांशू अवाना यांनी ६ हजार रुपये पेटीएमद्वारे पाठवले; मात्र वेळोवेळी पावती मागूनही ती मिळाली नाही. फोन केला असता, गुजराथी टाळाटाळ करत असल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
साई दर्शनासाठी शिर्डी येथे आल्यानंतर जोगीदरसिंग अवाना यांनी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. माळी यांनी साईबाबा संस्थानची अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर २८ मार्च रोजी जोगीदरसिंग अवाना यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात अमोल गुजराथी याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या घटनेने साईभक्तांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.