Ahmednagar News : अधिकाऱ्यांनी घरी बसून सर्व्हे केला का ? आ. तनपुरे विधानसभेत आक्रमक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जलजीवन योजनेंतर्गत हर घर नल, हर घर जल, च्या माध्यमातून प्रत्येक घरात शुद्ध पाणी देण्याचे केंद्र व राज्य सरकार सातत्याने सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र २५ टक्केच काम या योजनेचे होणार असून, उर्वरित ७५ टक्के काम वाढीव प्रस्तावात घेऊन केले जाणार असल्याचे या योजनेचे अधिकारी सांगतात,

मग संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांनी या योजनेचा सव्हें घरी बसून केला का? प्रत्येक कुटुंबाला जर पाणी मिळणार नसेल तर चुकीचा सव्हें करणाऱ्या एजन्सीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची गरज व्यक्त करत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी हर घर नल हर घर जल, या योजनेची गॅरंटी कोण देणार? अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनाप्रसंगी आमदार तनपुरे यांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जलजीवन योजनेच्या पाईपलाईनचे गाव- वाडी -वस्तीवर सुरू असलेल्या कामाबाबत सरकारचे लक्ष वेधले.

हर घर नल, हर घर जल, प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी ही फक्त घोषणाच आहे का? पंतप्रधानांची गॅरंटी म्हणून देश या योजनेकडे बघतोय; परंतु प्रत्येक घरात पाणी पोहोचणार नाही, असे आताच्या परिस्थितीवरून तरी लक्षात येत असून,

प्रत्येक वाडी – वस्तीवर पिण्याच्या पाण्याची योजना जाईल, अशी सर्वांची अपेक्षा होती; परंतु वीस वस्त्या एकत्र असतील तरच या योजनेचे पाणी तिथपर्यंत पोहचेल, असे अधिकारी सांगतात, त्यामुळे शेतीच्या व पशुधनाच्या सोयीने वस्तीवर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ होणार नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे.

मग हर घर नल, हर घर जल, हा चुनावी जुमला म्हणायचा का? अनेक विकासकामे मंजूर असून, त्याचे टेंडर निघाले. मात्र, वर्कऑर्डर होत नाहीत, कशासाठी वर्क ऑर्डर रखडल्या आहेत, मर्जीतल्या ठेकेदाराला कामे द्यायची म्हणून का? टक्केवारीसाठी विकास कामे रखडून ठेवलीत, अशा शब्दांत आ. तनपुरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.