अहमदनगर बातम्या

जिल्हा बँकेत २४ सोसायट्यांना साडेपाच लाखांची सवलत

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जाहीर केलेल्या एकरकमी परतफेड योजेनुतून २०१६ पूर्वीपासून थकीत असलेल्या शेतकरी कर्जदार सभासदांचे प्रस्ताव संस्थांनी सादर करण्यास सुरूवात केली आहे.

आतापर्यंत २४ सोसायट्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, २५ लाखांचा वसूल झाला आहे. तर सोसायटी सभासदांना सुमारे साडेपाच लाखांची सवलत मिळाली.

ज्या शेतकऱ्यांचे १ फेब्रुवारी २०१६ पूर्वीपासून थकीत असून त्यांना कोणत्याही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा थकबाकीदारांसाठी एकरकमी परतफेड योजना बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांनी १६ सप्टेंबरला जाहीर केली होती.

या योजनेचा लाभ घेऊन परतफेड करणाऱ्या थकबाकीदारांना लगेच नियमीत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यात अशा सुमारे ६०५ सोसायट्या थकबाकीत आहेत. या योजनेसाठी तालुका विकास अधिकाऱ्यांकडून छाननी केलेले प्रस्ताव बँकेच्या नगर येथील मुख्य कार्यालयात पाठवले जातात.

त्याचे पुन्हा ऑडिट करून संचालक मंडळापुढे ठेवली जाते. त्यानुसार शेवगाव २०, संगमनेर २ व राहता २ सोसायट्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले, त्यामुळे सुमारे २५ लाखांची वसुली झाली असून, कर्जदारांना पाच ते साडेपाच लाखांपर्यंत सवलत मिळाली.

२५ लाखांची कर्ज वसुली

५४० कोटींची थकबाकी २०१६ पूर्वी सोसायट्यांकडून पीक व मध्यम मुदतीचे कर्ज १९ हजार ४६४ शेतकऱ्यांकडे थकीत आहे. त्यात २६१ कोटींची मुद्दल व १७९ कोटींचे व्याज अशी एकूण ५४० कोटींची थकबाकी आहे. एकरकमी परतफेड योजनेतून दिल्या जाणाऱ्या सवलतीचा भार जिल्हा बँकेने उचलला असून त्यासाठी ४० कोटींची तरतूद केली आहे.

Ahmednagarlive24 Office