अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शैक्षणिक साधनांसाठी वंचित असतांना रोटरी क्लबने दिलेले रोटरी ई – लर्निंग डिजिटल स्कूल टॅब दिशादर्शक ठरतील असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून संगमनेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ९०० मुलांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी ई- लर्निंग डिजिटल शैक्षणिक ३०० टॅब वितरणाचा कार्यक्रम बुधवार दि. ७ रोजी मालपाणी लॉन्स येथे पार पडला, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.संजय मालपाणी, रोटरी क्लब पुणे नॉर्थचे कुमारजी शिनगारे, मनिषा कोणकर , रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा, सचिव योगेशजी गाडे, प्रकल्प प्रमुख सुनील कडलग ,ओंकार सोमाणी, डॉ. प्रमोद राजुस्कर, नरेंद्र चांडक उपस्थित होते. यावेळी सर्व १७ शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रातिनिधिक शिक्षिका वृषाली कडलग ,वैशाली हासे , श्रीकांत बिडवे यांनी टॅबचा स्वीकार केला. विद्यार्थी दत्ता कडलग याने मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी रोटरी क्लबच्या स्थापनेपासून क्लबने संगमनेरसाठी कशा प्रकारे योगदान दिले हे सांगितले.
तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये रोटरीद्वारे केल्या जाणाऱ्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच देशभरातील साक्षरतेचा प्रसार झपाट्याने होत आहे. रोटरी क्लबचा वाटा त्यामध्ये मोठा आहे असे गौरोद्गार काढले, रोटरी क्लब, पुणे नॉर्थ येथून आलेल्या सर्व क्लब सदस्यांचे त्यांनी स्वागत केले.
रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात रोटरी च्या समाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रकल्प प्रमुख सुनील कडलग यांनी कार्यक्रमा मागचा हेतू विषद केला. डॉ. प्रमोद राजुस्कर व नरेंद्र चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय मालपाणी म्हणाले की,
आपल्या मदतीद्वारे समाजातील प्रत्येक गरजवंताची गरज पुर्ण करायला मिळेल या भावेनतून रोटरी क्लब, संगमनेरतर्फे विविध कार्यक्रम हाती घेतले जातात यामध्ये समाजातील प्रत्येक घटक सामावून घेतला जाईल याची काळजी घेतली जाते. रोटरी क्लब सदस्य हे आधी करुन दाखवतात मग समाजाकडून ते करण्याची अपेक्षा ठेवतात.
या टॅब वितरणाद्वारे रोटरीने उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या मुलांपर्यंत ही मदत पोहचवून संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी क्रांती आणली आहे. हेच विद्यार्थी भविष्यात संगमनेरचे नाव जगात उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व त्यांच्या पालकांनाही रोटरी क्लबचा नक्कीच अभिमान वाटेल.
पुण्याहून खास आलेले या कार्यक्रमाचे पाहुणे कुमारजी शिनगारे यांनी शिक्षणासाठी गरजेच्या गोष्टींवर रोटरी क्लब लक्ष देत असून हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. आमच्या या प्रयत्नाला शासन स्तरावरुनही मदत होणे अपेक्षीत आहे अशी मागणी केली.
रोटरी जिल्हा ३१३१ व ३१३२ यांनी एकूण एक कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पाद्वारे १५०० शैक्षणिक टॅब वितरित केले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कॉम्पकीन या शैक्षणिक प्रणाली निर्मिती कंपनीचे संचालक बीरेन धरमसी उपस्थित होते. प्रकल्पासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या दानदात्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुषणकुमार नावंदर व संजय कर्पे यांनी केले तर आभार रो. योगेश गाडे यांनी मानले. चौकट – या कार्यक्रमास उपस्थित असलेले आ.डॉ. सुधीरजी तांबे यांनी त्यांच्या आमदार निधीतून पाच लाख तर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या आमदार निधीतून पाच लाख असे एकून दहा लाख निधी रोटरी ई – लर्निंग डिजिटल स्कूल टॅब साठी जाहीर केला आहे.
संगमनेर रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनीही या प्रकल्पासाठी ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या निधीमध्ये रोटरी इंटरनॅशनल ५० लाख रुपये रुपयांचे योगदान देणार असून हा निधी एकूण ६० लाखांचा होणार आहे. त्यातून संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक प्रकाशवाट निर्माण होणार आहे.
या टॅब मध्ये कॉम्पकीन कंपनीचा इयत्ता पहिली ते सातवीचा अभासक्रम समाविष्ट आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारा रोटरीचा हा डिजिटल स्कूल टॅब प्रकल्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी आपण रोटरी व शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी मिटींग घडवून आणू , असाही मानस आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.