विशेष शिबीराद्वारे कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राचे करणार वितरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जिल्ह्यात विविध शासकीय अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातींच्या सुमारे १ लाख ४७ हजार नोंदी आढळून आलेल्या आहेत. सदर नोंदींच्या आधारे सर्व पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी येत्या दि.२६ ते दि.३० जानेवारी या कालावधीत सर्व तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.

जिल्ह्यामध्ये विविध शासकीय अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातींच्या सुमारे १ लाख ४७ हजार नोंदी आढळून आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात सापडलेल्या सदर नोंदींच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी सर्व तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत विशेष शिबिरांचे दि.२६ ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.

ही विशेष मोहीम राबविण्यापूर्वी दि.२१ ते २५ जानेवारी या कालावधीत गाव पातळीवर त्या गावामध्ये आढळून आलेल्या नोंदींची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर माहितीच्या आधारे संबंधितांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करता येतील. तरी पात्र व्यक्तींनी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीच्या प्रमाणपत्रासाठी या शिबिरांमध्ये कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.