अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर: निवडणुकीच्या व्यापात सहकार निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी व्यस्त राहाणे क्रमप्राप्त असल्याने त्याचा परिणाम महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीवर होणे सहाजिक आहे.
हे लक्षात घेऊन जानेवारी ते जूनदरम्यान प्रस्तावित असलेल्या जिल्हा बँका व सोसायटींच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (दि. २७) उशिरा जारी करण्यात आला आहे.
मात्र जेथे न्यायालयाकडून निवडणूक आदेशित आहे किंवा जेथे नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा संस्था या निर्णयातून वगळण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा लाभ नगर जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळास होणार आहे. एडीसीसी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळास तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी अर्थात एडीसीसी नावाने सुविख्यात असलेल्या या बँकेची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली. बँकेचे प्रत्यक्ष कामकाज १ मे १९५८ रोजी सुरु झाले. मागील पिढीतील धुरिणांनी बँक ही शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांसाठीच काम करेल, असा दंडक घालून दिला.
राजकारणाचे व पक्षांचे जोडे बाहेर ठेवल्यानेच बँकेचा कारभार स्थापना काळापासूनच राज्य नव्हे तर देशपातळीवर नावलौकिक मिळवणारा ठरला आहे. बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ५ मे रोजी संपत असल्याने पंचवार्षिक निवडणुकीची धावपळ मागील दोन महिन्यापासून सुरू झाली आहे.
मतदानाचे ठराव घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. आता शासन निर्णयामुळे एडीसीसीच्या विद्यमान संचालक मंडळास तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढीमुळे कारभाऱयांना आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी उसंत मिळाली आहे.