२३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विविध श्रेणीतील ७०० जागांसाठी सरळसेवा नोकरभरती अंतर्गत मे. वर्कवेल इन्फोटेक प्रा.लि.या एजन्सी मार्फत पुणे येथील विविध परीक्षा केंद्रांवर दि.९ ते १३ व १९ जानेवारी या तारखांना उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षा पार पडल्या असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक जयंत देशमुख यांनी दिली.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, यावेळी परीक्षा केंद्रावर व्हिडीओ शुटींगसह उमेदवारांच्या योग्य त्या तपासण्या करून परिक्षा हॉल मध्ये सी.सी. टिव्ही. बसविण्यात आले होते. सी.सी.टीव्ही सर्व्हेईलन्समध्ये ही परिक्षा घेण्यात आली.
एकूण २८,२१९ उमेदवारांपैकी १६,८७९ उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेनंतर दि. २० जानेवारीपासुन सदरच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरतालिका उमेदवाराच्या लॉगईन आय. डी. वर देण्यात आल्याची माहिती ही देशमुख यांनी दिली.
उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांच्या काही हरकती असल्यास, उमेदवारांनी दि. २५ जानेवारीपर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात पुराव्यासह समक्ष हरकती नोंदविणेबाबतही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सरव्यवस्थापक यांनी दिली.