अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. याचसोबत लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते हेही झटत आहेत.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या मनातही काही प्रश्न असतील तर त्या थेट आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधत मांडता येणार आहेत.
येत्या रविवारी दिनांक ०२ ऑगस्ट, २०२० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर (@InfoAhmednagar) या फेसबुक पेजवर ‘लाईव्ह’ असणार आहेत.
दिनांक १२ मार्च, २०२० रोजी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महानगरपालिका,
जिल्हा परिषद आणि इतर यंत्रणा एकत्रितपणे या आव्हानाचा मुकाबला करत आहेत. लोकप्रतिनिधींचे पाठबळ त्यांना मिळत आहे.जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.
आरोग्य यंत्रणांचे सबळीकरण, आरोग्य यंत्रणेतील समन्वय, खाजगी आरोग्य यंत्रणांची याकामी मदत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आदीबाबत आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन अव्याहतपणे कार्यरत आहे.
जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात घेतलेले विविध निर्णय, रुग्णांची गैरसोय टळावी यासाठी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून तालुकापातळीवर केलेले नियोजन आदी बाबींवर ते संवाद साधणार आहेत.
रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी नागरिकांशी संवाद साधतील. जिल्हयातील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवून त्यांना असणार्या शंका,
प्रश्न यांची उत्तरे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्याशी थेट संवाद साधून निराकरण करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com