अहमदनगर बातम्या

जिल्हा रुग्णालय अग्निकांड ! ‘त्या’ चौघांच्या जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडव प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंता यांच्या जामिनावर युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

मात्र याबाबत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडवानंतर पोलीस फिर्यादी होत डॉ. शिंदे, परिचारिका पठारे, शेख, आनंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या चौघी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

जिल्हा रुग्णालयास (ता. 6 डिसेंबर रोजी अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉ. शिंदे आणि परिचारिका पठारे, शेख, आनंता या आगीच्या वेळेस आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर नव्हत्या. त्यांनी आपल्या कामात निष्काळजीपणा केला आहे.

त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूला त्या जबाबदार आहेत. त्यांना जामीन देऊ नये, असे म्हणणे सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अनिल ढगे यांनी सादर केले. तर दुसरीकडे आरोपींच्यावतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी बचाव केला, डॉ. शिंदे या शासकीय सेवेत नाहीत. त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या.

तसेच जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यावर डॉक्टर आणि परिचारिकांनी रुग्ण वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच काही रुग्णांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सर्वांना नियमित जामीन द्यावा, असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office