अहमदनगर बातम्या

जिल्हा कर्जवितरण मेळावा ! पाच हजाराहून अधिक खातेदारांना 117 कोटींचे कर्ज वितरण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यातील विविध बँका व अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कर्जवितरण मेळावा झाला. या जिल्हा कर्जवितरण मेळाव्यात 5 हजार 285 खातेदारांना 117 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले.

दरम्यान करोना संकटाचा प्रत्येक क्षेत्रावर विपरित परिणाम झाला. आर्थिक संकटात उभारी देण्यासाठी सरकार व बँकेने पाऊल उचलले आहे. समाजातील प्रत्येक घटकांच्या पाठीशी सरकार आणि बँक भक्कमपणे उभी आहे.

बँकेची अर्थव्यवस्था ही कर्जदारांवर अवलंबून असते, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी केले. पुढे बोलताना यमगर म्हणाले, बँकेच्या माध्यमातून कर्जदारांनी ज्या कामासाठी कर्ज घेतले, त्याच कामासाठी वापर करावा.

आपण कर्ज वेळेत भरल्यास त्याचा फायदा इतर कर्जदारांना कर्ज देण्यासाठी होतो. याचा आपण विचार केल्यास सर्वांची उन्नती त्या माध्यमातून होईल, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्था हा देशाचा प्राण आहे. सरकारी यंत्रणा, बँका या देशातील बेरोजगारी व गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

करोनामुळे मोठ्या संकटात आपण सापडलो आहोत. त्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जवितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्याला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रकाश शेंडे, सेंट्रल बँकेचे प्रकाश साबळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे रिजनल मॅनेजर हरिशंकर वस्स्, नाबार्डचे शीलकुमार जगताप,

उपजिल्हा निबंधक दिग्विजय आहेर, मंगलम, गीतांजली काटकर, एस. एस. शिंदे, बाबासाहेब सरोदे, अमोल कणसे यांच्यासह बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व कर्जदार लाभार्थी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office