अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : वाळूतस्करीच्या कारणातून मंडलाधिकारी, तलाठी निलंबीत ! जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे बंड, कामबंद आंदोलन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी वाळूतस्करी जोमात सुरु असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्या आहेत. या विरोधात महसूल पथक करावयाही करत असते. दरम्यान आता जिल्हाधिकारी याविरोधात ऍक्शन मोडवर आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनास प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत मंडळाधिकारी बी.एस. वायखिंडे व कामगार तलाठी नंदकुमार नागापुरे यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबीत केले. परंतु त्यानंतर या निर्णयाविरोधात तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बंड केल्याचे चित्र आहे. त्यांनी काल बुधवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

तालुक्यातील मातुलठाण परिसरात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन होत आहे. याची माहिती मिळताच दि. १४ जानेवारी रोजी रात्री एक वाजता जिल्हा गौण खनिज विभागाचे वसीम सय्यद यांच्या पथकाने येथील हनुमान मंदिराजवळ गोदावरी नदीपात्रालगत हायवा (क्र. एमएच ०६ डीडब्ल्यू २२८५) हा ट्रक अनधिकृत वाळू वाहतूक करताना पकडला.

त्यामध्ये सहा ब्रास वाळू होती. हा ट्रक पकडून त्यांनी श्रीरामपूर तहसील कार्यालयात जमा केला होता. याठिकाणी होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननास प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत नायगाव येथील तलाठी नंदकुमार नागापुरे व मंडलाधिकारी बी. एस. वायखिंडे यांनी उचित कार्यवाही केली नाही.

त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. गौणखनिज/१०/०३१६/ प्र.क्र.२०४/ख, दि. १४ जून २०१७ मधील नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाच्या निषेधार्थ तालुक्यातील तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांचे निलंबन अन्यायकारक असून ते विनाअट मागे घ्यावे या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या दोघांचे निलंबन हे अन्यायकारक असल्यामुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी यांनाही संघटनेने निवेदन दिले असून क्षेत्रिय स्तरावर काम करत असताना संबंधित तलाठी व मंडळाधिकारी यांच्या कोणत्याही अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस देऊन त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा घेण्यात आलेला नाही असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांचे काय आहे म्हणणे?

संबंधित ट्रक पकडून त्याचा पंचनामा करून तो तहसील कार्यालयात आणून लावलेला असून या ट्रकवरील वाहन चालक अनिल जाधव (वाईपांगरी, ता. सिन्नर) व ट्रकचे मालक मनोज साबदे, मंगेश वाणी (नांदुर्खी, ता. राहाता) असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आलेले आहे.

हा पंचनामा त्यादिवशी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पूर्ण करून पढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे दाखल करण्यात आल्याचे महसूल कर्मचारी संघटनेने म्हटलेले आहे.

Ahmednagarlive24 Office