अहमदनगर बातम्या

कोपरगाव आगाराचे दिवाळीचे उत्पन्न एक कोटीच्या पुढे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर विभागात कोपरगाव आगाराने सतत चांगली कामगिरी करत सर्वप्रथम स्थान टिकून ठेवले आहे. यंदाच्या दिवाळी सणात गतवर्षीपेक्षा कोपरगाव आगाराला केवळ ११ दिवसांत १ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे,

अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी दिली. पुन्हा एकदा कोपरगावच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना बनकर यांनी सांगितले, की दीपावली सणानिमित्त, कोपरगाव येथून, बाहेरगावी आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असल्याने तसेच महिला प्रवासी वर्ग तुलनेने जास्त असल्याने ही वाहतूक नियोजितरित्या पार पाडणे, हे खूप मोठे आव्हान होते,

परंतु यावर्षी आपण वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केले. ९ ते २० नोव्हेंबर या कालावधीत १ कोटी ६ लाख १७ हजार ५२० रुपये व सवलतीसह १ कोटी ७५ लाख ४४ हजार २१३ इतके उत्पन्न प्राप्त झालेले आहे.

या कामगिरीत अविनाश गायकवाड, वि. शि. साळुंखे, आगार लेखाकर श्रीमती सु. र. गवळी, वाहतूक निरीक्षक खेमनर गि. भा. खेमनर, सा. सु. सांगळे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक यो. दा. दिघे यांच्यासह कोपरगाव, शिर्डी आगारातील सर्व अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक यांत्रिक कर्मचारी आदी सर्वच घटकांचे मोलाचे योगदान मिळाले.

घसघशीत उत्पन्नाने आगारासह कामगार आनंदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीच्या शासनाने महिलांसाठी निम्म्या प्रवास भाड्यात योजना सुरू केली असून त्याचा अनेक महिला भगिनींनी लाभ घेतला आहे. त्यामुळे यंदाची भाऊबीज शिंदे- फडणवीस- पवार सरकारकडून महिलांना मिळाली, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी बससेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला.

Ahmednagarlive24 Office