अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. जिल्ह्याने रुग्णसंख्येची २० हजारी पार केली आहे. या पार्श्वभूमीवर जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी शुक्रवारी सकाळी आरोग्य समितीची आढावा बैठक घेतली.
यावेळी त्यांनी सद्य परिस्थितीस आळा घालण्यासाठी काही सूचना यावेळी दिल्या. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी तपासण्या वाढवाव्यात तसेच कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची 48 तासांच्या आत तपासणी करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
कोरोनाबधिताच्या संपर्कामध्ये आलेल्या सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात वारंवार धुणे अशी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. तसेच साथीच्या आजारांबरोबरच मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया अशा किटकजन्य आजारांच्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय
अधिकार्यांना त्यांनी सूचना दिल्या. नियमित लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग दुरीकरण व राष्ट्रीय सुधारित क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
कोरोना निर्मूलनासाठी जिल्ह्यात ‘ही’ मोहीम – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी नवीन मोहीम राबविली जाणार आहे. 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणार आहे.
त्यानुसार कुटुंबांचे सर्वेक्षण करून लक्षणे असणारे रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 755 टीम कार्यरत असणार आहेत. आरोग्य कर्मचार्यांमार्फत सर्वेक्षणादरम्यान मोबाईलवर उपलब्ध माहिती भरण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved