अहमदनगर बातम्या

निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई करु नये, अन्यथा पुन्हा धरणावर जावून…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अकोले निळवंडे डाव्या कालव्याचे काम करताना झालेला हलगर्जीपणा पहिल्या पाणी सोडण्याच्या चाचणीत उघड झाला आहे. त्यावेळी तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे आणि पिकांचे झालेले नुकसान विचारात घेता,

अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येवून निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई करु नये, अन्यथा पुन्हा धरणावर जावून आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या व अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनिता भांगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात भांगरे यांनी म्हटले आहे की, निळवंडे डाव्या कालव्यातून पाण्याची चाचणी घेण्यासाठी ३१ मे २०२३ रोजी पाणी सोडण्याची घाई करण्यात आली.

वास्तविक या कालव्यांची कामे अद्यापही पुर्ण नाहीत अनेक ठिकाणी कामामध्ये निष्काळजीपणा झाला असल्याने प्रथम चाचणीचे पाणी निवळ, टिटमेवस्ती, मेहंदुरी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तसेच कालव्या जवळील काही घरांमध्ये गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही वस्तुस्थिती आपण त्याच वेळी आंदोलन करुन, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पाणी तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.

आता पुन्हा याच डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. केवळ काही लोकांच्या हट्टासाठी या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रीया होणार असेल, तर अकोले तालुक्यातील शेतकरी ती यशस्वी होवू देणार नाहीत.

आधी कालव्यातील सर्व कामे पुर्ण करा, ज्या भागामध्ये पाण्याची गळती होते. पाण्याचा झिरपा होतो, अशा भागातील कामांच्या पुर्ततेबाबतचे सर्व निकष पूर्ण करुनच कालव्यातून पाणी सोडावे, ही आमची मागणी आहे.

कालव्यांच्या कामातील चुकांकडे दुर्लक्ष करुन, जलसंपदा विभागाने कोणाच्या दबावाखातर किंवा कोणाच्या आदेशाने पाणी सोडले, तर तिव्र आंदोलन करण्याच इशारा आम्ही आजच देत आहोत.

मागील वेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याचीच भरपाई शासन अद्याप देवू शकलेले नाही. आता पुन्हा या कालव्यांच्या पाण यामुळे होणाऱ्या नुकसानीचा बोजा अंगावर घेण्याची मानसिकता या भागातील शेतकऱ्यांची नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनाचा विचार करुन, जलसंपदा विभागाने डाव्याकालव्यातून पाणी सोडताना गांभिर्याने विचार करावा, अन्यथा होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. या संदर्भात आम्ही दोनच दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेवून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचेही भांगरे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office