माझ्या विरोधात तक्रार करतो काय …! सरपंचाने शेतकऱ्याच्या अंगावर घातली कार

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सरपंचाने तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिल्याने त्या विरोधात तक्रार केली म्हणून सरपंचासह त्याच्या साथीदाराने शेतकऱ्याच्या अंगावरच चारचाकी गाडी घालून तसेच शिवीगाळ व मारहाण करत त्याचे डोके गाडीच्या बोनेटवर आदळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडली आहे.

या घटनेत दिलीप रामभाऊ कोकाटे हे जखमी झाले आहेत. तर सरपंच शरद खंडू पवार व सुरज किशोर भोज या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१५ साली आमचे गावातील सरपंच शरद खंडु पवार याने तहसीलदार यांना खोटे शपथपत्र दिले होते. त्याबाबत आपण तक्रारी अर्ज केला होता. त्या अर्जाची दि.२० डिसेंबर २०२३ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. आपण केलेल्या तक्रार अर्जाबाबत सरपंच पवार याच्या मनात राग होता.

दरम्यान आपण कामानिमित्त मोटारसायकलवर नगरकडे जाण्यास निघालो असता नगर जामखेड रोडवर पाठीमागुन अज्ञात वाहनाने मला जोराची धडक दिली. धडक दिल्याने आपण गाडीसह खाली पडलो. त्यामुळे मला मुका मार लागला मी उठुन पाहीले असता मला धडक देणारी गाडी पुढे जावुन रोडच्या कडेला थांबली व त्यामधुन ड्रायव्हर साईडने सरपंच शरद खंडू पवार व दुसऱ्या बाजूने सुरज किशोर भोज हे उतरले.

माझ्या जवळ येवुन मला शरद पवार हा म्हणाला की तु माझ्याविरूद्द तक्रारी अर्ज करतो काय. तुला गाडीची धडक देवुनही तु अजुन कसा काय जिवंत राहीला, मी तुला संपविल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणुन शिवीगाळ केली. त्यावेळी सुरज भोज याने मला शिवीगाळ करून माझे हात धरले व शरद पवार याने हाताने डाव्या डोळ्यावर, पाठीवर मारहाण केली व माझे डोके धरून त्याचे गाडीचे बोनेटवर आपटले. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी आमचे भांडण सोडविले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe