श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलचे डॉ. संदीप देवरे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव येथील ३६ वर्षीय तरुणाच्या कुटुंबात आंनद निर्माण झाला आहे. बनकर आडनावाच्या तरुणाच्या उजव्या हातामध्ये अचानक मुंग्या येऊन हात दुखायला लागला आणि हात उचलायचा बंद झाला.
त्यावेळी त्याला शिर्डीतील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप देवरे यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या उजव्या हाताचा शुद्ध रक्तवाहिनीचा प्रवाह रक्ताची गुठळी जमा होऊन बंद झाल्याचे लक्षात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हाताची एंजियोग्राफी करत पेशंटला त्वरित कॅथलॅबमध्ये नेण्यात आले व त्याची एंजियोग्राफी करण्यात आली. यात खांद्याच्या खाली रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी होऊन रक्तवाहिनी बंद पडून रक्त पुढे जात नव्हते.
डॉ. देवरे यांनी त्वरित शस्त्रक्रिया करत दुर्बिणीद्वारे रक्ताची गुठळी काढून रक्तप्रवाह सुरळीत केला. पेशंटचा त्रास बंद झाला आणि पेशंटच्या हाताची हालचालसुद्धा सुरू झाली. त्यामुळे रुग्णाचा निकामी होणारा हात वाचला.
रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले, की खासगी हॉस्पिटलला लागणारा एक दिड लाखांचा खर्च त्यांना परवडला नसता आणि नाशिक, नगरला जाईपर्यंत हातही वाचला नसता. येथे नुसता आमच्या पेशंटचा हातच नाही तर उद्ध्वस्त होणारे घरच मोठ्या संकटातून वाचले.
पेशंट एकटाच कमावणारा होता. याबाबत डॉक्टरना विचारले असता त्यांनी सांगितले, की हे अत्यंत धोकादायक असते. कारण रक्तप्रवाह सुरळीत न झाल्यास हात कायमचा निकामी होऊन हात कापूनसुद्धा काढावा लागतो व पेशंटला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते.
यावर रक्ताची गुठळी त्वरेने काढणे हाच उपाय असतो. या व अशा आधुनिक उपचार पद्धती श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याची माहिती डॉ. देवरे यांनी दिली.
योग्य, त्वरित आणि अत्यंत कमी खर्चात झालेल्या उपचारांबद्दल नातेवाईकांनी साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीसह अधिकारी व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.