अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनेक दिग्गज डॉक्टरांनी काम करण्यास नकार देत येथून निघून जाणे पसंत केले आहे.
सध्या स्थितीला या ठिकाणी उपचारासाठी येणार्या रुग्णांची हेळसांड होत असल्याने साई संस्थान प्रशासनाने रुग्णालयाकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शताब्दी वर्षानंतर विविध रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रामराम ठोकला आहे.
यामध्ये न्युरोसर्जन डॉ. किशोर गोडगे, जनरल सर्जन डॉ. थोरात, ऑर्थोपेडीक डॉ. प्रशांत, सोनोलॉजिस्ट डॉ. राजश्री शिंगारे, एमडी मेडीसिन डॉ. अविनाश जाधव यांच्यासह अतिदक्षता अपघात विभागातील डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्याबरोबर अनेक आरएमओ डॉक्टरांनी साईबाबा रुग्णालयास रामराम केला आहे.
दरम्यान राजीनाम्याचे सत्र सुरू झाले असून ते थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे तर नवीन डॉक्टर येथे येण्यास इच्छुक नाही. अनेकदा भरतीसाठी विविध वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. यास काही कारणे असून यामध्ये प्रामुख्यने येथील डॉक्टरांना संस्थानकडून दिला जाणारा इन्सेटिव्ह,
अत्यल्प पगार, तातडीने निवासस्थानाची सोय उपलब्ध नाही आणि अकुशल कामगारांची दडपशाही या प्रमुख कारणाने या ठिकाणी अनुभवी आणी तज्ञ डॉक्टर काम करण्यासाठी इच्छुक नाही. दरम्यान साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सर्वात जास्त हृदयरोगाचे रुग्ण येत असतात.
तसेच या ठिकाणी बायपास सर्जरी करणार्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनअंतर्गत अनेक शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध असल्याने किडनी रोग, मेडिसिन, मेंदूरोग, अस्थिरोग, जनरल सर्जन, सोनोलॉजिस्ट आदी तज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्णांचा ओढ आहे.
दरम्यान साईबाबांच्या रुग्णसेवेचा वसा जपण्यासाठी दोन्ही रुग्णालयात जातीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी शिर्डीतील ज्येेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.