अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा शहरातील एका निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन डॉक्टरांनी मोफत उपचार केले आहे. या निराधार वृद्ध महिलेचे नाव प्रभावती भिंगारदिवे असून, या महिलेचे पाय आणि हाताचे हाड मोडल्याने ती जीवघेण्या वेदनांचा सामना करत होत्या.
या महिलेच्या वेदनादायी समस्यांकडे शहरातील हाडांचे तज्ज्ञ डॉ. अनिल शिंदे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तिच्या झोपडीत जाऊन पैसे न घेता पाय, हातावर उपचार केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा शहरामध्ये एक पाय अगोदरच मोडल्याने अपंगत्व असलेल्या प्रभावती भिंगारदिवे या महिलेस राहण्यासाठी घर नव्हते.
अग्निपंख फाऊंडेशनच्या सदस्यांनी ही परिस्थिती जाणून भिंगारदिवे या महिलेस पत्र्याचे शेड उभे करण्यासाठी १० हजारांची मदत केली होती. दरम्यान, शेडचे काम चालू असताना प्रभावती भिंगारदिवे यांचा एक पाय आणि हात एकाच वेळी मोडला.
या महिलेकडे मोफत उपचार व स्वस्त धान्यसाठी आवश्यक असलेले रेशनकार्ड नसल्याने तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी एक दिवसात रेशनकार्ड देण्याचे सहकार्य केले. पुढे भिंगारदिवे या महिलेस सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांच्यावर उपचार होत नसल्याने, त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. पण तेथे सुध्दा काही फायदा झाला नाही. त्यांनतर प्रभावती भिंगारदिवे या आपल्या गावी आल्या व दरवाजा नसलेल्या झोपडीत जीवघेण्या वेदनांशी झुंज देऊ लागल्या.
डॉ. अनिल शिंदे यांचे लक्ष या महिलेच्या वेदनादायी समस्यांकडे गेले असता, त्यांनी झोपडीत जाऊन भिंगारदिवे यांच्या पायावर प्लास्टर केले. तसेच भिंगारदिवे यांना औषधांसाठी अग्निपंखचे विश्वस्त मधुकर काळाणे, अरिहंत महिला उद्योग समूहाच्या प्रतिभा गांधी यांनी मदत केली.
पुढे या वृध्द महिलेस त्यांच्या अपूर्ण झोपडीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशांत देसाई, महावितरणचे शाखाभियंता काळे यांनी वीज देण्यासाठी मदतीची भूमिका घेतली आहे.
या संदर्भात पुढे बोलताना डॉ. अनिल शिंदे म्हणाले की, जीवनात गरिबी काय असते मी अनुभवली आहे. त्यामुळे प्रभावती भिंगारदिवे या वृद्ध आजीच्या पायावर प्लास्टर केले.
श्रीगोंदा तालुक्यातील अनाथ निराधार व भूमिहीन इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खेळताना अगर अपघातात हातापायाचे हाड मोडले तर अशा विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहे. मात्र त्यासाठी मुख्याध्यापकांची शिफारस आवश्यक आहे, असे डॉ. अनिल शिंदे यांनी सांगितले.