अर्बन बँकेविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नगर अर्बन बँकेच्या चाकण व सिन्नर या तोट्यात चाललेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय बँकेचे हित पाहूनच घेतला.

मात्र, काही जण जाणूनबुजून सोशल मीडियामधून बँकेबद्दल अपप्रचार करत आहेत. सभासद, ठेवीदार व कर्जदारांनी अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले. नवनीतभाई बार्शीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नगर अर्बन बँकेत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी बँकेचे प्रशासक मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, प्रमुख व्यवस्थापक सुनील काळे, राजेंद्र डोळे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नवनीतभाई बार्शीकर यांनी नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून आदर्शवत काम केले. बँकेच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे, असे मिश्रा म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे म्हणाले, नगर शहराच्या विकासात जेवढे बहुमोल योगदान नवनीतभाई बार्शीकर यांनी दिले आहे, तेवढेच मोलाचे कार्य अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी त्यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24