अहमदनगर बातम्या

आनंदाचा शिधा वाटपात तक्रार नको, योग्य नियोजन करावे : आ. काळे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : महायुती शासनाकडून शिवजयंती निमित्त देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळण्यासाठी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या मोफत साडी वाटपाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.

कोपरगावात ११८०० लाभार्थ्यांना मिळणार शिवजयंतीला आनंद शिधा आणि साडीचा लाभ वर्षभर विविध सणानिमित्त स्वस्त धान्य, रेशन दुकानातून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे.

चालूवर्षी अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रेशनकार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप सवलतीच्या दरात देण्याचे जाहीर केले असून शिवजयंतीचा वितरीत करण्याचा ‘आनंदाचा शिधा’ सर्व रेशन दुकानात पोहोचला आहे.

त्याचप्रमाणे या आनंदाच्या शिधासोबत महायुती शासनाच्या वस्रोद्योग विभागाने रेशन दुकानावर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. त्यानिर्णयानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थीला दिली जाणार असून शिवजयंती सणाच्या निमित्ताने अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशन दुकानात मोफत साडी वितरण करण्यात येणार आहे.

कोपरगाव मतदार संघातील सर्व रेशन कार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येत असून यामध्ये साखर, तेल, रवा, मैदा, चनाडाळ, कच्चे पोहे या ६ शिधा जीन्नसाचा समावेश असून सर्व कुंटुबांना या सर्व शिधाजीन्नस मिळाल्या पाहिजेत.

तसेच मतदार संघात अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेले एकूण अकरा हजार ८९६ कुटुंब आहेत. या प्रत्येक अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांना साडी वितरण करण्यासाठी जातीने लक्ष घालून एकाही नागरिकांची तक्रार येणार नाही, याची काळजी घेऊन योग्य नियोजन करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office