निकृष्ट कामे करणाऱ्यांची बिले अदा करू नयेत -आमदार पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात येऊ नयेत अश्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपच्या ठिय्या आंदोलनांच्या प्रसंगी दिल्या.

श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून खराब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या चालू आहे पण हे काम करताना सार्वजनिक बाधंकाम विभागाचे अधिकारी संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे अतिशय निकृष्ट पद्धतीने कामे चालू आहेत. त्यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा व ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष नागवडे यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार हे भागीदारी मध्ये कामे करतात त्यामुळे कामाचा दर्जा खालावला आहे असा गंभीर आरोप केला. त्याचबरोबर मागीलवर्षी खड्डे बुजविण्याचे व आता चालू असलेल्या कामाच्या निधीची माहिती मागितली असता संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही, नागवडे यांनी अतिशय मुद्देसूद प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ झाल्याचे दिसून आले.

यावेळी आंदोलनात सहभागी झाल्यावर आमदार बबनराव पाचपुते म्हणाले रस्त्याच्या बाबतीत काम करताना मागच्या काळात ज्या पद्धतीने कामे झाली आहेत तसा कारभार आपल्या काळात सहन करणार नाही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करु नये. असा इशारा देतानाच आ. पाचपुते यांनी आंदोलन स्थळाहून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पवार यांचेशी संपर्क साधून रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या.

यावेळी उपअभियंता अम्पलकर यांनी आंदोलन कर्त्यांना कामात सुधारणा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यावेळी आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, दत्तात्रय जगताप , नगरसेवक अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे, संतोष खेतमाळीस, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस, महावीर पटवा, संग्राम घोडके, संतोष क्षीरसागर, भगवान आप्पा वाळके, नितीन नलगे, सौ. सुहासीनी गांधी, जयश्री कोथिंबिरे, दिपक शिंदे, उमेश बोरुडे, अमोल अनभुले, अमोल शेलार,काकासाहेब कदम, अमर छ्तीसे, विनोद होले, दिपक हिरनावळे, महेश क्षिरसागर, राजेंद्र नागवडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अधिकाऱ्यांची पोलखोल करणार- नागवडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना लेखी पत्र देऊनही कामाचा दर्जा सुधारला जात नसेल तर आज केलेल्या आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल व अधिकारी व ठेकेदार यांची असलेली आर्थिक युती चा पर्दाफाश करणार अशी प्रतिक्रिया भाजप चे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24