टाकळीभान :- नोकरीसाठी कुठल्याही पुढाऱ्याच्या दारात फिरू नका, असा सल्ला टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित सन्मान कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्नल राजेंद्र धुमाळ यांनी दिला. धुमाळ म्हणाले, शाळेत मी सर्वसाधारण विद्यार्थीच होतो.
महाविद्यालयात गेल्यावर मी ठरवलं की, मला काय व्हायचं आहे. मनात ठरवलं, तर काहीही होऊ शकतं. नोकरी करत असताना मला घरच्या लोकांची कधी काळजी वाटली नाही, कारण मला घरच्यांची साथ होती, तर घरच्यांना गावकऱ्यांची साथ होती. चांगल्या प्रकारचे शिक्षण घ्या, जेणेकरून नोकरीसाठी कुठल्याही पुढाऱ्याकडे जाण्याची गरज पडणार नाही. स्वतःच्या हिमतीवर नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा, यश नक्की येईल.
शैक्षणिक सुविधांसाठी एक लाखाची देणगी त्यांनी शाळेला जाहीर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार होते. ते म्हणाले, अटकेपार झेंडा फडकवणारे कर्नल धुमाळ यांचा सन्मान करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले. अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून स्वकर्तृत्वावर त्यांनी कर्नलपदापर्यंत मजल मारली, याचा सर्व टाकळीभानकरांना अभिमान आहे.
या वेळी राहुल पटारे, बापूसाहेब पटारे, भारत भवार, वंदना मुरकुटे, नवाज शेख व विद्यार्थी प्रज्ज्वल नवले अादींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राज महंमद शेख, उपसरपंच पाराजी पटारे, रोहिदास पटारे, गणेश पवार, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव, चंद्रकांत थोरात, भय्या पठाण, नारायण काळे, राजेंद्र कोकणे, संजय पटारे, राजेंद्र नवले,
सुरेश गटकळ, रावसाहेब मगर, चित्रसेन रणनवरे, प्रकाश धुमाळ, रमेश धुमाळ, शिवाजी धुमाळ, भाऊसाहेब मगर, राजेंद्र आदिक, शंभर शिंदे, रघू शिंदे, मोहन रणनवरे, राजेंद्र रणनवरे, अविनाश लोखंडे, अप्पासाहेब रणनवरे, एकनाथ पटारे, खंडेराव गवांदे, आनंदराव धुमाळ, सीताराम पवार आदी उपस्थित होते.