अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-गेली अनेक महिने कोरोनाचे संकट देशावर घोंगावत होते. अखेर या महामारीला रोखण्यासाठी वॅक्सीन तयार करण्यात आली आहे. याच अनुषंगाने 16 जानेवारीपासून देशभर लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.
त्याचबरोबर नगर जिल्ह्यात देखील लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना लसीची नागरिकांनी भीती मनात बाळगली आहे. यामुळे उलटसुलट चर्चाना वाव मिळाला आहे.
या अफवांना रोख बसावा यासाठी राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी माहिती दिली आहे. कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यानंतर किरकोळ प्रमाणात ताप, अंग दुखणे, मळमळ होणे आदी लक्षणे जाणवतात.
त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणावेळी जिल्ह्यात चार आरोग्य कर्मचार्यांना जाणवलेली लक्षणे याच प्रकारची होती. त्यामुळे कोणताही गैरसमज या लसीकरणाविषयी नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींची लवकर चाचण्या होणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या. करोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे किंवा मनात किंतू बाळगण्याचे कारण नाही.