Ahmednagar News : डॉ तनपुरे साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने जो निर्णय घेतला होता त्यासाठी आज एकच निविदा आल्याने डॉ तनपुरे कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्याच्या हालचालींना ब्रेक लागला आहे.
कारखान्याचे आजचे मरण उद्यावर गेले आहे. प्रशासकांनी तातडीने निवडणूक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्याचे जिल्हा बँकेकडून जवळपास निश्चित झाले होते, मात्र यासाठी एकच निविदा आल्याने जिल्हा बँकेने काल शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत असलेला विषय क्रमांक १९ रद्द केला आहे.
त्यामुळे कारखान्याचे आजचे मरण उद्यावर ढकलले गेले असल्याची प्रतिक्रिया सभासदांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ निवडणूक लावण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
कारखाना २५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत पुणे येथील उद्योगपती श्रीयुत दुग्गड अँड कंपनीची केवळ एकच निविदा आल्याने जिल्हा सहकारी बँकेने ही प्रक्रिया थांबबली आहे.
राहुरी तालुक्यातील शेतकरी सभासद व कामगार संघटना यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. कारखाना भाडेततत्वावर चालविण्यास दिला तर सभासद, शेतकरी व कामगार यांचा जिल्हा बँकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असता.
हा कारखाना शेतकरी सभासद व कामगार संघटना यांच्या मालकीचा राहावा म्हणून कारखाना बचाव कती समिती सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ निवडणूक घेऊन कारखाना सभासदांच्या प्रतिनिधींना चालविण्यास देण्याची मागणी होत आहे.
कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण कडू, पंढरीनाथ पवार, राजेंद्र शेटे, संजय पोटे, दिलीप इंगळे, कोंडापाटील विटनोर, सुखदेव मुसमाडे, भगवान गडाख, अप्पासाहेब ढूस, सुभाष करपे, भारत पेरणे यांच्यासह तालुक्यातील तमाम शेतकरी व कामगारांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,
सर्व सदस्य व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले असून कारखान्याची निवडणूक घेऊन कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवून निवडून आलेल्या संचालक मंडळाला कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा अधिकार देण्यात यावा,
त्यासाठी कारखान्याच्या इतर संस्थांच्या असलेल्या बाकया वसूल करून त्या पैशांमधून निवडणुकीचा निधी भरावा व निवडणूक लावावी, अशी मागणी केली आहे.