दरवर्षी ०१ ते ०७ सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो. देशातील कुपोषण दर कमी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाची सुरुवात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. अन्नाचे पाच आवश्यक अन्नगट जाणून घेण्यासाठी पोषक आहार संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतो. याबद्दल विविध गटातील जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा सदरील सप्ताह साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे.
दरवर्षी, राष्ट्रीय पोषण सप्ताहासाठी एक विशिष्ट थीम निवडली जात असून यावर्षीच्या सप्ताहाचे घोषवाक्य ‘सर्वांसाठी पोषक आहार’ असे असून जीवनाच्या सर्व टप्प्यांवर लोकांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करणाऱ्या आहारांना प्रोत्साहन देण्यावर ते लक्ष केंद्रित करते.
सर्व गटातील लोकांसाठी निरोगी आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी यावर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाने सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडीतील मुलांचा आहार तपासणी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी, नर्सिंगच्या मुलींसाठी आहाराचे नियोजन कसे असावे याविषयी व्याख्यान, प्रसुती झालेल्या मातांना फळांचे वाटप, मातोश्री वृद्धाश्रमात फळांचे वाटप आणि पोस्टर प्रदर्शनाद्वारे समतोल आहाराविषयी जनजागृती करणे, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदरील उपक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला असून परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर आणि उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात पोषक आहारास अनन्यसाधारण महत्व असल्याचे पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.
या सप्ताहाच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक अमोल आनाप, प्रिती कडू, विशाल पुलाटे आणि श्वेता भिंगारदिवे यांनी केले. तसेच नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. संस्थेचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. रामचंद्र पडळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.