डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयात रॅगिंगविरोधी जनजागृती कार्यक्रम

Pragati
Published:

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे रॅगिंगविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्रास देणे, धमकावणे, खोड्या काढणे, मनाला टोचणारी बोलणी करणे, लिखित स्वरूपात त्रास देणे, गैरवर्तन करणे, तसेच मानसिक त्रास देऊन विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करणे असे प्रकार टाळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माणिक चौधरी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना श्री. माणिक चौधरी म्हणाले की, “रॅगिंग हा एक गंभीर गुन्हा आहे. विद्यार्थी रॅगिंगला कंटाळून आत्मघाताचे पाऊल उचलतात, तर दोषी विद्यार्थ्यांचे भवितव्य डळमळीत होते.

त्यामुळे सरकारने या संदर्भात कडक कायदे केले आहेत. शिक्षक आणि पालकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांनी अशा कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे, कारण रॅगिंग हे अक्षम्य कृत्य आहे. कोणतीही तक्रार असल्यास 112 हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा.” तसेच, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक उद्देशासाठीच करावा, असेही त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहावे, आणि कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होत असल्यास त्यांनी तात्काळ महाविद्यालयात तक्रार करावी. तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल.” या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe