Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व लहामगे याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
परंतू परीसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभागाची ड्रोन टिम पुढील काही दिवस बिबट्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत राहाणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील लोणी येथील अथर्व लहामगे या ९ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अर्थवचा मृत्यू झाला. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत काल सोमवारी (दि.१५) सायंकाळी लहामगे कुटुंबियांची तातडीने भेट घेवून त्यांना दिलासा दिला.
तसेच हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी केली. शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे लहामगे परिवाराला शासनाच्या वतीने २५ लाख रूपयांची मदत करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. लहामगे कुटुंबियांचे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. या संकटात आम्ही सर्वजण त्यांच्या समवेत असल्याचे त्यांनी कुटुंबाला दिलासा देताना सांगितले.
लोणी आणि परिसरच नव्हे तर जिल्ह्याच्या अन्य भागातही बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वन विभाग प्रयत्न करीत आहे. पण बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अन्यही यंत्रणाचा उपयोग आता करावा लागणार असून यासाठी विभागाची ड्रोन टिम या भागात आणि अन्य काही ठिकाणी सक्रीय करून बिबट्याचा रहिवास असलेली ठिकाण शोधून काढण्यासाठी प्रयत्न करणार असून
तशा सूचनाही विभागाला देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्ह्याच्या उपवन संरक्षक सुवर्णा माने, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.