Ahmednagar News : यंदा पावसाने अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्रच ओढ दिली. त्यामुळे जलाशय देखील पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे सध्या अहमदनगर जिल्ह्यामधील ग्रामीण भागात टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरले असून पाणीटंचाई देखील जाणवू लागली आहे. त्यामुळे आता शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील १३० महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे.
या महसूल मंडळात दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात आल्या. दुष्काळ जाहीर झालेल्या महसूल मंडळांत जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या चालू विज बिलात ३३.५ टक्के सूट व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,
आवश्यक तेथे पाणी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी उपायोजना लागू करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी जून महिन्यापासूनच पावसाने ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम धोक्यात आला होता. जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरिपाचे उत्पादन देखील घटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार परतीच्या पावसाकडे होती.
मात्र परतीचा पाऊसही अल्प प्रमाणात झाल्याने रब्बी हंगाम देखील वाया गेला होता. कमी पावसामुळे शेतीचे उत्पादन घटले.
टँकरची मागणी वाढली
मागील महिन्याभरापासून ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आता पाणी टँकरला प्रचंड मागणी वाढली आहे.
यापूर्वी ५० पैशांपक्षा कमी आणेवारी असलेली ९६ महसूल मंडळे जाहीर करण्यात आली होती. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता दुष्काळी महसूल मंडळाची संख्या आणखी ३४ ने वाढली. १३० महसूल मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे.