Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा, याबाबतचे निवेदन शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतांशी तालुक्यांमध्ये यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
अनेक तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विहिरी व बोरच्या पाण्याची पातळी खालवत चालली आहे. त्यामुळे यावर्षी जनावरांसाठी चारा व छावण्या तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने त्या-त्या तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबतचे नियोजन करावे.
शेतकऱ्यांना रब्बी व खरीपाचे पीक पाण्याअभावी जळून चालले आहेत तर फळबागा पाण्याअभावी उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शासनाने नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करुन त्यावर उपाययोजना करणेबाबत योग्य ते नियोजन करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी प्रा. गाडे म्हणाले, यंदाच्या पावसाळा हा पुर्णपणे कोरडा गेला आहे. जिल्ह्यात जुन महिन्यात पासून झाला नाही, जुलै महिन्यात थोडाफार झाला, त्यानंतर ऑगस्ट व आता सप्टेंबर महिन्यातही पाऊस न झाल्याने केलेली पेरणी वाया गेली आहे.
त्यामुळे दुबार पेरणीची संकट निर्माण झाले असून, त्यातच पावसाचीही शक्यता दिसत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना पीक विमा, वीज बिल माफी, अनुदान अशा स्वरुपाची मदत करण्यात यावी, असे प्रा. गाडे यांनी म्हटले आहे.