Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांचा अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ सध्या अटकेत आहेत.
यातील व्यवस्थापक गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला न्यायाधीशांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे आता व्यवस्थापक गुंजाळ याला न्यायालयासमोर हजार करावे लागणार आहे.

संगमनेर तालुक्यातील नावाजलेल्या दूधगंगा पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन असलेला कुटे अनेक महिने पसार होता. त्याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला.
तर पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हा देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच स्वतःहून पोलिसात हजर झाला होता.
त्या वेळेपासून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू आहे.
या खटल्यात जामीनावर मुक्तता झालेले अन्य पाच आरोपी न्यायालयीन तारखांना उपस्थित राहतात मात्र तुरुंगात असलेल्या भाऊसाहेब गुंजाळ याला मात्र जेल प्रशासनाकडून न्यायालयीन कामकाजाच्या वेळी उपस्थित ठेवले जात नसल्याने अखेरीस गेल्या आठवड्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी या संदर्भात आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.
त्यामुळे पुढील तारखेवेळी गुंजाळ याला न्यायालयासमोर जेल प्रशासनाला हजर करावे लागणार आहे. दरम्यान या पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असून या प्रकरणाकडे अनेक ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.