शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव परिसरात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाल्यानंतर जून महिन्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या कमी जास्त प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरिपाची पेरणी केली. त्यानंतर पिकेही जोमात आली; परंतू गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार बुरबुर पावसामुळे पिके रोगाला बळी पडत आहेत.
त्यामुळे पिकांची वाढ खुंटुन रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तसेच पिकांमध्ये तणांचे प्रमाण वाढल्याने मजूर मिळत नसल्याने येथील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यावर्षी शेतकऱ्यानी महागडी खते, बी बियाणांवर मोठा खर्च करत, पेरणी केली होती.
यात कापूस, मूग, उडीद, तुर, पिकासोबत सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या या पावसावर बियाणांची उगवण झाली. त्यानंतर अनेक दिवस पाऊस गायब झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर तालुक्यातील काही गावांत चांगला पाऊस झाला.
यामुळे पिके चांगली जोमात आली; परंतु नंतर पाऊस तसा कमी जास्त प्रमाणात होत गेला. पाच दिवसांपासून शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव, आखतवाडे, गरडवाडी, आव्हाणे, मळेगांव, भातकुडगांव, आपेगाव, मलकापूर, या परीसरात रिमझिम पावसाने पुन्हा हजेरी लावली.
परंतू ऊन पडत नसल्याने पिकांची वाढ खुंटून पिके रोगराईला बळी पडत असून, पिकांमध्ये तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च वाढला आहे. तालुक्यातील अनेक गावांत अद्याप मुसळधार पाऊस नसल्याने नदी नाले वाहिले नाहीत, परिणामी विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही, त्यामुळे शेतकरी मोठया पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून सूर्यदर्शनही झाले नसल्याने पिकांची वाढ देखील मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. सततच्या झिम झिम पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 51687 ट्रायकोडर्मा, या जैविक बुरशीनाशकाची चार किलो प्रति एकर, याप्रमाणे पाऊसमान पाहून फवारणी करावीः सुनिल होडशीळ (मंडळ कृषी पर्यवेक्षक, ढोरजळगाव) यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.