Ahmednagar News : पूर्वी शेतकरी परंपरागत शेती करण्यात गुंतला होता. आडते, इतर व्यापारी यांच्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नव्हता. परंतु कंपनी कायद्यात शेतकरी उत्पादक संकल्पना आल्यानंतर देशभरात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे तयार झाले.
त्यामुळे परंपरागत शेती करणारा शेतकरी हा निर्यात करणारा उद्योजक झाला, असे प्रतिपादन कायदेशीर सल्लागार (कंपनी कायदा) ॲड. गणेश शेंडगे यांनी केले.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अटल भूजल योजनेअंतर्गत ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना व संधी’ या विषयावर जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना व नोंदणीची प्रक्रिया या विषयावर ॲड. शेंडगे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर,
आत्माच्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी, तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकाश अहिरे, कृषी अधिकारी टिमकिरे, जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेचे समन्वयक महेश शेळके, भूवैज्ञानिक विभागाचे राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
ॲड. शेंडगे म्हणाले की, सहकार कायदा व खासगी कंपन्या याचे एकत्रित स्वरूप म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या होय. शेतकरी उत्पादक कंपन्यामुळे शेतकऱ्यांकडून समूह शेतीचा विस्तार होऊ लागला आहे. त्यातून विक्री, व्यवस्थापन शेतकरी स्वतः करू लागले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात उत्पादक शेतकरी हा निर्यात करू लागला आहे. शासनाच्या अनेक योजना या फक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्रित करून तयार करण्यात आलेल्या आहेत.
सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी सारख्या शेतकरी उत्पादक कंपन्याची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे. हे सर्व साध्य झाले कंपनी कायद्यात तरतूद केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यामुळेच. शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होण्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
तसेच पहिली पाच वर्ष करातून सवलत मिळते. खासगी व सरकारी बँकाकडून कर्ज मिळते. तसेच सभासद शेतकऱ्यांकडूनही भाग भांडवल जमा करणे व ठेवी स्वीकारणे, यातून भांडवलाची निर्मिती करून उद्योगाचा विस्तार करता येतो. एफपीओ संकल्पना शेतकऱ्यांना मिळालेले वरदान आहे.
आत्म्याच्या चौधरी म्हणाल्या की, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून फक्त शेतजमिनीचा पोत सुधारत नाही, तर सध्याच्या युगात मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय पिके वरदान आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा शेतात किमान दहा गुंठे सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली पाहिजे. सेंद्रिय शेतीचे स्वतंत्र बाजारपेठ तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
तंत्रज्ञान व्यवस्थापक अधिकारी अहिरे म्हणाले की, केंद्र शासनाची प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना, राज्य शासनाचे स्मार्ट यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी लाभदायक आहेत. शासनाच्या काही योजना या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उभारणीपासून अनुदान देण्याचे काम करते.
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना कार्यात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग व आत्मा यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ भूविज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व शिक्षण संवाद तज्ञ गणेश पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जलसंधारण तज्ञ हनुमान शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी तज्ञ शितल बिडगर, प्रियंका खरात- शेंडगे, स्नेहा वैराळ, गणेश शिंदे, कानिफनाथ नाकाडे, राजेंद्र शिंदे, सुनील शेळके, बलभद्र बोहरा, ऋषिकेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.